Cycle To Work Blog By Abhijit Kupate

Image result for cycle to workपावसातबी कसं काय सायकलनच येतोस किंवा कस जातोय बाबा ? भिजायल होत नाही काय? आसले प्रश्न खरं तर पडायला नकोतच. तरीही  खूपजण विचारत असतात. 

मी तर "दरवर्षी पावूस कधी पडणार आणि मी कसा भिजणार ह्याची जरा जास्तच वाट बघत असतोय". ह्यावर्षी तेवढा पावूस पडला नाही आणि  अशावर उपाय किंवा सोल्युशन असं वगैरे गजुला लिहून देतो आणि लिहायच म्हणता म्हणता राहून गेलं. पावसाळासुद्धा संपून गेला. आता सुरु झालीये ऑक्टोबर हिट. 

बरेच लोक ऑफिस लांब आहे (अगदी ५ किमी वगैरे) ? इकडे गाडयांना  जायला जागा नसते तर सायकली अशा रस्त्यावरून जाणार का ? सायकलस्वार हिंजवडी, बाणेर आणि पुण्यात सुरक्षित असतो का ? ल्यापटोप नेता येत नाही. कपडे घामाने भिजतात.  सायकल मध्येच पंक्चर झाली तर कसं ? कपडे जर दुसरे घालून आलो तर कुठे बदलणार? अशा भरपूर शंका बाळगत असतात. मग कुठेतरी ऑफिसला सायकल यायचं हि कल्पना आणि हा आगळा वेगळा प्रकार काय तरी केलं पाहिजे अशा अवस्थेत धुळ खात पडतो.

तर घाम येतो. अंतर खुप लांब आहे. ट्रॉफिक. लैपटॉप. ऊन. खूपच रिस्की. असे शाळेतल्या मुलांसारखे प्रश्न आजही विचारणारे भेटतात आणि ते साहजिकच आहे. त्याला कारणही अनेक आहेत. एक तर आपली सायकल संस्कृती किंवा हा अमूल्य ठेवा आपल्याल्या एका पिढीकडून आला नाही किंवा त्याचा फारसा आपण कुणीच गांभीर्यान विचारही  केला नाही आणि म्हणूनच अशा प्रश्नार्थकांनी हे असलं  सायकलिंग वगैरे काही कालावाधीसाठी आजमवून पाहिलं वगैरे नाही. 

सुशिक्षित, शिक्षित लोकांना कितीही पटवुन सांगितल तरी आज समजत नाही. मी पेट्रोल एफोर्ड करू शकतो ! अशी भयानक प्रत्युत्तरे भेटतात. भारतात वरून खाली नजर टाकली तर असे दिसून येईल कि सायकलिंग करणारा, पळणारा, पोहणारा हा नव वर्ग वय वर्षे ३८ नंतरचा आहे. अगदीच नवीन नोकरीत रुजू झालेला  तरुण वर्ग आपल्या रोजी रोटी आणि प्रपंच स्थिरस्थावर करण्यात गुंतलेला आहे. विकेंडच ऍडव्हेंचर, हवाबदल विरंगुळा एवढेच तकलादू पर्याय म्हणून तो विचार करतो. एडवेंचर, स्वतःचे आरोग्य, समूहाचे आरोग्य, संबंध समाजाचे प्रश्न हे आपलेच प्रश्न आहेत याविषयी तो संभ्रमात असतो आणि सर्वस्वी उपाय हे प्रशाषणाचेच आहेत यावर तो वेळोवेळो शिक्कामोर्तब करतो. विस्कटलेल्या तमाम वाहतूक आणि व्यव्यस्थेचा अविभाज्य घटक आणि हे असच चालू राहणार यावर शिक्कामोर्तब करत तो लगे रहो, आज बढो असे रोजचा दिनक्रम चालू ठेवतो  रस्त्यावर खरचं आपण सायकलवर येऊ शकतो या बद्दलचा विश्वास आणि शाशंकतेत तो असतो.असो. 

तर  मग सायकल जड आहे. थकायला होतं तसेच वर नमूद केलेली विविध कारणे देत सायकलवर कामावर किंवा दूर पल्ल्याच्या सायकल सहलीवर जायचा प्लान मरगळून पडतो. खरं तर प्रयत्न करायला हवेत. आजमवुन पहायला हवं किंवा  मी तर म्हणेन सगळ काही आतून पार हृदयातून  यायला हवं. 

इथे रस्त्यावरून कामावर जायला सायकली वापरणा-यांशी मी वेळ काढुन अर्थात त्यांना वेळ असेल तर त्यातला काही वेळ मागून काढून गप्पा मारत असतो. ऑफिसमधला सुक्यूरिटी स्टाफ, रस्त्यावरचा साध्या एटलास वरच कामाला जात असणारा आणि खुश असणारा एखादा गारेगारवाला मामा, कामावर घाईत चाललेली मावशी आणि लहानगी पोरं ही सगळीच माझ्या यादीत आहेत. 

कुठेही जायचे असेल तर केंव्हाही सुलभ, अतिशय सोप्प साधन म्हणजे सायकल नावाचं सुटसुटीत स्वायत्त मशीन जे  बाजारात ३  हजारांपासून ३० लाखांपर्यत आज उपलब्ध आहे. 

त्याच किंमतीच प्रयोजन आणि ते प्रकरण जरा वेगळं आहे. त्याविषयी नंतर चर्चा करूयात. 

कुणालाही चालवायला सुटसुटीत आणि बजेट मध्ये बसत असणारी कुठल्याही प्रकारची सायकल ह्या कामावर घेवून जाण्यासाठी चांगल साधन आणि शक्य अशी युटिलिटी आहे. 

माझीच सुरवात सांगतो. माझ्याकडे सहावी पासून चांगला  हट्ट करून घेलेली हर्क्युलसची गियरची सायकल जी आजही गावी आहे. त्यावर भरपूर शॉक ओब्सर्व्ह्र आणि फिचर्स चा मारा केलेली २१ गेअरची पप्पांनी घेवून दिली होती. भरपूर पिदटल्यावर, खोलून जोडून, मोडून परत  जोडून तिला मामाच्या मुलाला दिली. नंतर तब्बल १० वर्षे मी सायकलींच्या संपर्कात अजिबातच नव्हतो किंवा ह्या वयात सायकलवर इतक प्रेम जडेल हे ध्यानीमनीसुद्धा नव्हतच.

मनाली ते लडाख सायकलिंग दौऱ्यासाठी मी माझ्या एका मित्राची एमटीबी प्रकारातली "राले ०.५" सरावासाठी वापरली आणि तिकडे ती अशी जुनी नाही चालणार, मधेच हिला कायतरी झालं तर आपलं कसं होणार? अशा शंका बनवून माझं मीच ठरवून अमेरिकेहुन परत आलेल्या मित्राची इथे असलेली एक सायकल वापरून पाहून मी मरीन ब्रांडची ड्यूअल स्पोर्ट्स प्रकारातील हायब्रीड सायकल विकत घेतली.

पुन्हा  पुरेसा अनुभव आणि कुणीच काही व्यवस्थित माहिती देत नसल्याने तीही तिकडे कशी काय न्यायची असे करत करत मग आम्ही सायकली तिकडूनच भाड्याने घ्यायचे ठरवले. त्याचा एक फायदाच झाला. मी सूर्या, जय आणि पांडे हे मित्र वापरत असलेल्या आणि स्पेअरच्या दोन सायकली आलटून पालटून वापरण्याने खरतर १० दिवसात ५ विविध बनावटीच्या सायकलीची वापरून अनुभव घेण्याची संधी मिळाली. त्यात स्कॉट, ट्रेक, राले, मॉंन्ट्रा, जाएन्ट असे नामांकित ब्रांडस होते.पूर्वतयारी म्हणून केलेल्या भरपूर राइड्स. नंतर, मनाली, लेह,  गोवा, लोणावळा, पंढरपूर, पुणे ते कन्याकुमारी, स्पिती, युरोप, मॉरिशियस अशा दूर पल्ल्याचे अनुभव गाठीशी बांधत गेलो. लेहचा एक टी  शर्ट घालून मी रावेतवरून ऑफिसला येताना पाहून अजितने मला आयसीसी ग्रुपचा सभासद करून टाकलं .

लोकं सायकल विकत घ्यायचा नुसता विचार करतात ? आता घेवू उद्या घेवू असा करत काहीजण विसरून पण जातात. ऑफिस मधल्या दोन तीन मैत्रिणी सायकल कुठली चांगली? गेअर वाली की साधी इथच अडकल्या. एकतर पार लग्न होवून आता पोरं-बाळं वगैरे. असो 

उदाहरण सेट करुया म्हणून मग मीच माझ्या होणा-या बायकोला साखरपुड्यात सायकलच भेट देवू केली. चांगला संदेश म्हणून मित्राच्या लग्नात सायकलवरून वरात काढली. बातमी वगैरे आली पण सायकलिंग विषयी म्हणाव तसं प्रबोधन तिकडून होत नाही. म्हणून इथे हा  लिखाण प्रपंच. 

तर अचानक ठरलेल्या दूर पल्ल्याच्या सायकल सहलीचा सराव आणि त्यासाठी वेगळा वेळ नको म्हणून मी सायकलवर कामासाठी यायला सुरवात केली ते आजतागायत निगडी -प्राधिकरण ते बाणेर उन्हाळा, पावसाळा, हिवाळा कामासाठी फक्त सायकलच हे अंगवळणी पडलं आणि हे सुरुच आहे. त्यासाठी  मी माझी स्कोर्पिओ दादाला देवून टाकली आणि किती डीझेल वाचवलंय हे तुम्हीच ठरवा.

पहिले वाटायचं कि खूप घाम येणार. मग ऑफिसमध्ये शॉवर वगैरे असायला हवा. मग चालू झाली शॉवर वरची धडपड. विनंती मेल आणि चर्चा. ऑफिस प्रशासनाने अशा मागण्या अमान्य करत प्रयत्न चालू आहेत अशी उत्तरे दिली. खरं तर १५ किमीच्या सायकल परेडसाठी शॉवरची गरज नाही हे नंतर मला हळू हळू  पटायला लागलं. 

ऑफिसला जाताना हनीकोम्म कापडाचे मित्राने शिवून दिलेली टीशर्ट आणि ऑफिसला घालायचे कपडे पाठीवरच्या ब्यागेत. असा प्रवास सुरु झाला. अगदीच खूप घाम आला तर छोटासा न्याप्कीन पाण्याने भिजवून क्विक, सटासट शॉवर अशी कल्पना कामी येवू लागली.   

उन्हाळ्यात पाठीवरच्या ब्यागने अगदी चिंब प्रकरण होवू लागले तेंव्हा स्वत:च पिशवी शिवून सायकलला अल्युमिनियमचे हलके क्यारीयर लावून जुन्या फटफटीच्या डिक्कीप्रमाणे दोन्ही बाजूला  पिशवी  लावत अशा चिंब प्रकरणावर उपाय शोधला.

दोन्ही बाजूला लटकलेल्या पिशवीत एका बाजूला सायकलच सगळं आणि  हो  पंक्चरच सगळं,

सायकलचं पंक्चर आणि माझं वेगळ नातं आहे. कदाचित ते सगळ्यांच आहे.

सायकलवरून ऑफिसला येणं, पार्किंगमध्ये सायकल नीट उभी करून ऑफ़िस आटपून सायकल सुस्थितीत विशेषत: चाकामध्ये व्यवस्थित हवा असणं, 
घरी पोचल्यावर ती घराच्या गैलरीत उभी करून दुस-या दिवशी झोपून उठल्यावर सायकलच्या चाकात टकाटक हवा असणं, तेंव्हाच माझी दिवसाची सायकल पूर्ण होते.

पुणे आणि पंचक्रोशीत तुमच्या सायकलचे पंक्चर गाडीचे पंक्चर रिपेअर करणारे रिपेअर करू शकत नाहीत हा अचंबित करणारा विषय आहे. त्याविषयी माझे आणि मित्रांचे भरपूर अनुभव आहेत त्यातले काही तुम्ही माझ्या फेसबुक टाईमलाईनवर वाचले असतीलच.

माझा एक मित्र साहिल टिळकरोड ला राहतो तो  कात्रजला रपेट मारून सायकलवर घरी परतत होता. स्वारगेटजवळ त्याची सायकल पंक्चर झाली. तिथल्या आसपासच्या टु व्हीलर, कारच्या पंक्चर रिपेअर वाल्यांनी रिपेअर करायला नकार दिला.

सायकलच्या पंक्चर काढणा-यांनी नाना कारणे सांगत त्यात ऑईल वगैरे आसतय, हिकडं निघत नाही असा न चा पाढा लावला. ग्रीन सिटी, स्मार्ट सिटी  पुणे.  कसं होणार रे अभ्या? काय कळना म्हणून सायकल ढकलत तो घरी परतला. 

मी म्हंटल स्वावलंबन सायल्या स्वावलंबन. घाबरू नगोस आपण एका पंक्चर काढायच्या खर्चात भरपूर पंक्चर काढु शकतोय कसं ते उद्याच प्रात्यक्षिक करून दाखवतो. कुठं? तर स्थळ: साहिल्याचा वाडा, पंतांचा गोट, टिळक रोड. पुणे ३०. वेळ सकाळी ११:३० ते १२:३० आणि इथे प्रात्यक्षिक घेतलं. साहिल आता तयार झाला. 

तर गेली चार वर्षांपासुन अशीच स्थिती पुणे आणि उपनगरात आहे. त्यापासुन बोध घेत रस्त्यावर कुठं पंक्चर झालच तर पंक्चरवाल्याचच पाणी वापरून मी पंक्चर काढतो. सायकलचे पंक्चर काढणे ह्यात विषेश असं काही नाही. तरीपण हे लोकं नकार का देत असतील हा ही एक गुड्ड प्रश्न आहे.

तुरळक जुनी, परराज्यातुन आलेली कष्टाळु लोकं सोडली तर पुण्यात सेवा द्यायची की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आणि हेच ज़र कोल्हापूर किंवा कुठही ग्रामिण भागात घडलं तर तुम्हाला कशी सेवा मिळेल हे मग  तिकडेच अनुभव किंवा तिकडकच्या कुणालाही विचारा.

तर त्याच डिक्कीत वर रोजचा डब्बा  व एका बाजूला ऑफिसचे कपडे  अशी भूमिका नवी पिशवी बजावू लागली.  पिशवी अगदीच मोठी असल्याने पावसाळ्यातही तिचा वापर  रेनकोट आणि अतिरिक्त साहित्य, परत येताना घरी फळे भाज्या इत्यादीसाठी होवू  लागला. 

जेंव्हा ऑफिसला गाडी घेवुन यायचो तेंव्हा कधी कधी ऑफिसमोरूनच ऑफिसात येण्यासाठी साधारणत: ५०० मीटर अंतरावरून यु टर्न मारता मारताच तब्बल २५ मिनिटे खर्ची पडायचे . 

सायकलवरून घर ते ऑफिस असं साधारणतः १५ किमीचं अंतर मोठ्या गाडीतून ४० मिनिटे आणि सायकलीवर  सरासरी ४५ मिनिटांत उरकुन निघू लागले. शिवाय ट्राफिकमध्ये थांबा, परत गाडी चालवा थांबा. तेसच बेशिस्त ट्राफिक अशा मनस्तापा ऐवजी मी माझी दररोजची  ५ मिनिटे कोम्प्रमाइज करायला तयार झालो.  

ज्या गल्ली बोळातून जात नव्हतो असे गल्लीबोळ शोर्टकट्स. लोंग कट. अजून वेळ वाचवण्यासाठी हायवे असे वेगवेगळे रस्ते पकडून आनंद साजरा करू लागलो. पावसात भिजू लागलो. उन्हाळ्यात  गॉगल वापरून उन्हाची   मजा घेवू लागलो.

मी एमएच बाराच्या गाड्यांना आरामात ओव्हरटेक करु लागलो. खचाखच भरलेल्या पीएमपीएलच्या बसेस २००६ ते २००९ साला इतक्याच खचाखच. आता त्या थोड्या बदललेल्या मी दुरूनच पाहतो. प्रवाशांना उभे राहायला जादा जागा हाच काय तो बस मध्ये  झालेला बदल तो सहज बाहेरून बघत असतो.

आसल्या खचाखच ट्राफिकमध्ये १ ते २ टनाचा आपली गाडी / लोखंडी गोळा हाकायला खरचं मज्जा येत असेल काय? तर आजिबात नाही. 

माझाच  अनुभव  सांगतो. आज काल  शहरात  एक दोन किमी पुढे जावा. ब्रेक मारा. परत गाडी एक्सलरेट करा. परत सिग्नल परत ट्राफिक. परत ब्रेक. असं हे सायकल मध्ये रोज रोज रिपिट करत रहा. तोवर माझी सायकल व मी हळूवारपणे  पुढे निघून जातो.

जुलै महिन्यात मी खास युरोप सायकल भ्रमतीवर होतो. तिकडे स्थानिक सायकलीस्टना मला माहिती असणारा एखाद्यी ब्रांडच नांव चर्चेत माझ्या कडून यायचे, पण ब्रांड प्रकरण हे युरोपात लागू होत नाही. क्वालिटी हा तोच ब्रांड असं काहीसं ते जाणवलं.

आपल्याकडे तुफान चर्चेत असणा-या स्कॉट,मेरीडा,मरीन,ट्रेक,ज्यायंट हे तिकडच्या लोकांना माहितीच नाही उलट संतोस, गाझले आणि तिथल्या  प्रत्येक देशाच्या स्थानिक उत्पादित सायकली ह्या तुफान लोकप्रिय आहेत. अर्थात तशी क्वालिटीही आहे. मागे एक मित्र म्हणायचा जर्मनी आणि युरोपियन लोकांसाठी कुठल्याही आंतरराष्ट्रीय कंपन्याना आपली उत्पादन मानांकने काटेकोरपणे बदलून युरोपचे निकष पाळून ती बाजारात उतरवावी लागतात.आणि ते मी डोळ्यादेखत पाहत होतो अनुभवत होतो. या उलट नेमकं आपल्याकडे आहे. लोकांना फीचर्स दिसले की लोकं भाळतात. पण क्वालिटीचं काय ? 

विकसित देशात सायकल ही जीवनाचा अविभाज्य घटक आहे. रोटी,कपडा, मकान आणि सायकल आसं काहीसं समीकरण  आहे. पेट्रोल महाग असं नाहीये. पेट्रोल १.३९युरो प्रति लिटर, तर टोमाटो बटाटे २.२५+ युरो प्रति किलो, पाणी १.२५ युरो प्रति लिटर, कोक ३३० मिली १ युरो. प्रत्येक घरात आयुष्यभर टीकणा-या सायकली असाव्यात असा पिंड आहे आणि त्या अभिमानानं उभ्या आहेत. 

तिकडं फिरताना माझे आजोबा बापू आठवतात. एखादी वस्तू त्यावेळी अशीच विचार करून घेतली किंवा बांधली जायची त्यांची आटलास तारा सायकल आजही ६० वर्षे जुनी असून अगदी डौलानं चालते तशीच आजच्या तारखेला बनवायची म्हटली तर २५ हजार आरामात खर्ची पडतील. मला आठवतय तेंव्हा मी मामाकडं जाणार म्हणून हाट्टून बसायचो. तेंव्हा आमचे  बापू मला सहा किलोमिटर त्यांच्या च्योविस इंची तारा सायकलवरून वरच्या नळीला हातरूमाल गुंडळुन त्यावर बसवुन गावाकडं घिवून जायचत.

पाच दहा किलोमीटर येजा करण्याची वैयक्तिक साधने म्हणजे फक्त सायकलिंशिवाय काहीच नाही अशी त्यावेळपासुनची परिस्थिती मी माझ्या बालपणात अनुभवली.कदाचित तुम्हीही अनुभवली असेलच. माझ्या वडिलांकडे आजतागायत ना मोटार ना गाडी. माझ्याकडही तेच. हौसेपुरता घेतलेली  स्कॉर्पिओ, आमच्या अक्काच्या भाषेत रणगाडा सोडला तर आजपर्यंत कुठलीही दुचाकी नाहीच.

नव्वदच्या काळात आणि त्याच्या आधी इकडे नुस्त्या सायकली. ये जा करण्यासाठी पायी किंवा सायकलि आणि त्यांचा शांत माहौल काय नजरा असणार, मी तर कल्पना करूनच खुश होतो. भारतदेश आधीच सायकलिंसीठी फॉरेनपेक्षा सरस होता. पण आज ह्यासाठी आपल्याला युरोप, इंग्लडचे दाखले ऐकावे लागतात असे मी माझ्या इटुकल्या पोराला सांगतो आणि घरातूनच  अनावधानं  मिळालेला सायकल चा ठेवा अविरत चालेल याची काळजी घेतो. हळूहळू क्रमाने आपल्या #cycletowork  वर लिहतो.

--

अभिजीत कुपटे....