Cycle Wari Part 5 (Last) By Vijay Vasave

सायकलवारी भाग-५ (शेवट)

 

पहाटे लवकर ऊठुन सर्व पसा-याची आवराआवर केली. बॅटरी बॅंक सोबत होती पण मोबाईलची केबल आणलेली नव्हती अशी त-हा. गार्मिनची केबल, जीपीएसची केबल आणि मोबाईलची केबल अशा तीन तीन केबल सोबत न्याव्या लागतात. नेमकी मोबाईलची केबल घरी विसरलो, सायकलमित्र अविनाश अनुशे यांनी त्यांची केबल दिल्यामुळे माझा मोबाईल चार्ज होऊ शकला, नाहीतर परतीचा प्रवास हा सोशल मिडीयाविना घडला असता. हॅंडलबार बॅग, सॅडल बॅग आणि टयुब बॅग नेऊन सायकलला व्यवस्थित बांधल्या आणि उरलेले साहीत्य सॅकमध्ये कोंबुन  ती पाठीला अडकवली. परतीच्या प्रवासात सॅक ट्रकमध्ये न टाकता मी स्वत:च्या पाठीवर घेणार होतो, विंचवाचं बि-हाड! पांडुरंगाची कृपा म्हणजे पहाटे साडेपाच वाजल्यापासुन नाष्टा मिळायला सुरुवात झाली. पोट एवढे रीकामे झाले होते की विचारता सोय नाही. प्रचंड भुक लागलेली होती. या अवस्थेत सायकल चालवायला सुरुवात करणे शक्यच नव्हते. ऊपमा, शिरा आणि पोहे यांचा खरपुस म्हणजे अतिशय खरपुस समाचार घेतला. श्री व सौ. निलेश आणि आरती या चव्हाण कुटुंबाबरोबर नाष्टा करण्याचा योग आला. या दोघांचे सायकलिंग खरोखरच प्रेरणादायी आणि थक्क करणारे आहे.

 

नाष्टा झाल्यावर मी सायकलकडे वळालो. पांडुरंगाला पुन्हा एकदा हात जोडले आणि मनाशी पुटपुटलो, "जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता" खरंच जो काही अध्यात्मिक आणि आत्मिक आनंद या सायकलवारीतुन मिळालाय तो शब्दात मांडणे खरोखर अशक्य आहे. श्रीहरी विठ्ठलाच्या चरणांवर नतमस्तक होण्याची संधी मिळाली अजुन काय हवंय? लाभले आम्हास भाग्य म्हणुन आम्ही सायकल चालवतो आणि लाभले आम्हास अहोभाग्य म्हणुन आमच्याकडुन ही सायकलवारी घडली. आयुष्यात सायकल चालवण्याच्या निमित्ताने पंढरपुरचे दर्शन झाले हि गोष्ट काय साधी नाही झाली. श्री गजानन महाराजांच्या मठाच्या आवारात श्रीराधाकृष्णांचेही दर्शन झाले. धन्य झालो. हातात बासरी आणि बाजुला राधा असलेली मुर्ती. कमरेवर हात ठेऊन ऊभे असलेले श्रीहरींचे रुप मी पहील्यांदा पाहीले. 

 

शंकरदादाने एक मस्त कविता करुन आणली होती. शंकर ऊणेचा (दादा) म्हणजे एक अफलातुन व्यक्तीमत्व आहे. जोरजोरात टाळया आणि एका सुरात मोठयाने भजन म्हणायला लावुन त्याने सर्वांची मरगळ घालवली आणि आजच्या राईडसाठी एक ऊत्साही वातावरण तयार केले. भजन झाल्यावर आम्ही खुप ग्रुप फोटो काढले. जे ग्रुप फोटोमध्ये नाहीयेत ते पंढरपुरमधुन लवकर हलले होते. या सायकलवारीचे नियोजन अतिशय उत्तम होते. नियोजनात कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा किंवा चालढकल औषधालाही नव्हती. १८ वर्षांपासुन ते जवळजवळ ७० वर्षापर्यंतचे सायकलपटु या सायकलवारीत सहभागी झालेले होते तसेच महीलांचाही समावेश होता. पण सर्वांची योग्य प्रकारे काळजी घेण्यात आली. गजु, अजित, गिरीराज, गणेशभाऊ आणि ईतर असंख्य आयसीसीचे सभासद ही सायकलवारी यशस्वी करण्यासाठी मनापासुन झटत होते. सर्व आयसीसी परीवाराचे मनापासुन धन्यवाद. "बोला पुंडलिकवरदेव हरी विठ्ठल...." म्हणत आम्ही सायकलवर बसलो आणि पुढच्याच वळणावर झिमझिम पाऊस यायला सुरुवात झाली. रस्त्यावरचे पाणी चाकाबरोबर गोल गोल फिरुन मडगार्डला धडका देऊ लागले. ज्याकारणासाठी सायकलला मडगार्ड बसवले होते त्यासाठी त्याचा उपयोग झाला. जेव्हा पंढरपुरकडे जाताना एक थेंबही पाऊस लागला नाही तेव्हा असे वाटले होते की ऊगिच मडगार्ड बसवले पण पंढरपुरातुन निघताना बरे झाले मडगार्ड बसवले असे वाटल्यावाचुन राहीले नाही. 

 

पावसाची रीपरीप आणि रस्त्यावरचा ओलावा फार काळ टिकला नाही. वारा आणि पाऊस एकावेळी त्रास देत नाहीत, एक जातो आणि एक येतो. नातेपुते रोडला लागल्यावर पाऊस गायब झाला आणि आता माझी पाळी म्हणत वारा अंगावर आला. काल युतीत असलेला वारा आज विरोधी पक्षात गेला होता. त्या वा-यावर माझी सायकल हेलकावे खाऊ लागली. मडगार्डमुळे वा-याचा अवरोध जास्तच जाणवत होता. क्षणार्धात सायकलची गती मंदावली. उतारावरही सायकल गती घेईना, मती गुंग होण्याची वेळ आली. काय करावे कळेना. सपाट रस्त्यावर गती वाढवायला गेले की वारा अंगावर धावुन यायचा. एखाद्या शिस्तप्रिय सरांच्या वर्गात बसल्यासारखे वाटायला लागले, अजिबात हालचाल करायची नाही जेवढे सांगितलंय तेवढेच करायचे. सायकलचा वेग वाढवायचा नाही जो मिळेल तो गुपचुप घ्यायचा आणि पेडलवर पाय फिरवत रहायचे. आपल्या मनाला वाटेल तो वेग घ्यायला परवानगी नव्हती. नातेपुते ईथे नाष्टयाचे आयोजन केलेले होते. हा नाष्टा जय मल्हार संस्थेने पुरस्कृत केला होता. भविष्यात या सायकलवारीची व्याप्ती एवढी वाढणार आहे की याची आपण कल्पना करु शकत नाही. यावरील माझे लेख वाचुन मला जवळजवळ १५ ते २० जणांचे मेसेज आलेत की "पुढच्यावेळी मी या सायकलवारीला येणार म्हणजे येणार..." त्यामुळे ज्या कोणाला या सायकलवारीचे प्रायोजक वगैरे व्हावयाचे असेल ते आत्ताच व्हा, नाहीतर भविष्यात ही संधी मिळणारही नाही. 

 

पंढरपुर ते नातेपुते हे ७० किमीचे अंतर पार करायला ४ तासांपेक्षा जास्त वेळ लागला. वा-याशी दोन हात करता करता सर्व शक्ती खर्च झाली होती आणि एवढी भुक लागली होती की काय सांगु. नाष्टा करताना मी कोणतीही हयगय केली नाही. भरपुर नाष्टा केला आणि मगच पुढच्या प्रवासाला निघालो. सायकलवारीचा परतीचा प्रवास म्हणजे केवळ वारा..वारा..वारा आणि वारा एवढंच सांगता येईल. आजही नुसते वारा वाचले तरी सायकलवारीमध्ये परतीचा प्रवास केलेल्यांना जोरात वाहणा-या वा-यात अडकलोय असे वाटायला लागेल. ताशी ३० किमी वेगाने वाहणा-या वा-याने आम्हाला सळो की पळो करुन सोडले होते. काही सायकल वारक-यांनी वा-याच्या या अतिरेकापुढे शरणागती पत्करली तर माझ्यासारखे काहीजण "बचेंगे तो और भी लढेंगे" म्हणत तोफांचे आवाज येईपर्यंत लढत राहीले. परतीचा प्रवास आम्ही ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीमार्गाने करत होतो. रस्ता अतिशय सुरेख होता पण या वा-यामुळे त्या सुंदर रस्त्याचे कौतुक करायचे लक्षातच राहीले नाही. सायकलवारीचा तपशील फेसबुकवर अपलोड करत राहील्यामुळे प्रविण जागडे या मित्राची भेट घडली. पंढरपुरला बस घेऊन चालला होता, नातेपुतेमधील माझे फेबु अपडेट पाहुन मला भेटण्यासाठी तिथे आला. मला त्यांच्या बसमध्ये घेऊन गेला आणि  बसमधील सर्वांना त्याने आपल्या सायकलवारीची माहीती सांगितली. पुण्याहुन सायकलवर आलो हे ऐकुन सर्व बसने टाळ्यांचा कडकडाट केला. टाळ्या ऐकुन खुप बरे वाटले. अगोदरच मर्कट आणि त्यात अशा टाळ्या वगैरे मिळाल्यावर तर विचारुच नका. त्यापुढचे १० किमी मी जास्तच जोरात सायकल चालवली.       

 

रस्त्यात दहा किमीच्या अंतरावर कार थांबलेली असायची. त्यात पाणी, चिक्की, खजुर आणि गुडदाणी खायला मिळत असे. तेवढाच बुडत्याला काडीचा आधार. सोबत ट्रकही असायचा. त्या ट्रककडे पाहील्यावर सायकल त्यात टाकण्याचा मोह आवरत नसे. आणि आपल्या सोबत सायकल चालवणारे त्यात आरामशीर बसलेले पाहीले की मग तर विचारुच नका. शरीर जरी थकलेले असले तरीपण मनाचा दृढनिश्चय कायम होता. फलटणला कसाबसा पोचलो. फलटण ते लोणंद हा प्रवास अतिशय खडतर. वा-याला कोणीतरी डिवचले बहुतेक तो जास्तच फणा काढु लागला. वा-याच्या वाढत्या वेगाचा मान राखत मिळेल त्या वेगाने हॉटेल शिवार गाठले आणि भरपुर जेवलो. लोणंद ते जेजुरी आणि जेजुरी ते सासवड सायकल चालवायला फार कष्ट लागले नाहीत. दिवे घाटाच्या उतारापर्यंत वा-याने पिच्छा सोडला नाही. दिवे घाट उतरल्यावर सुटकेचा निश्वास टाकला. खुप भुक लागली होती पण चावुन खाण्याचेही त्राण शिल्लक राहीलेले नव्हते म्हणुन हडपसरमध्ये एका ठिकाणी टोमॅटो सूप घेतले. टोमॅटो सूपच्या जोरावर आणि पांडुरंगाच्या कृपेने रात्री साडेअकरा वाजता सुखरुप घरी पोचलो. एकुण सायकलवारी ४४० किमी झाली. माझ्या या सायकलवारीची चिंता कोणी केली असेल असे मला तरी वाटत नाही. जसे हुषार विद्यार्थ्याची पास होण्याची काळजी कोणाला नसते, सर्वांची नजर फक्त त्याच्या मार्कांवर असते. तसेच माझ्या सर्व मित्रांची नजर मी किती वेळात सायकलवारी पुर्ण करतोय याच्यावर होती. मी पुर्ण करु शकणार नाही असे कोणालाही वाटले नसेल.

 

त्या बीआरएममध्ये भाग घ्यायचे बंद केल्यापासुन ही माझी सर्वात मोठी राईड. मी ३ वेळा एसआर झालोय पण अजुन २ एसारचे मेडल मिळालेले नाहीयेत, कधी मिळतील तेही माहीत नाही. हि आपली स्वदेशी राईड मला खुप आवडली, सायकलवारीच्याच दिवशी संध्याकाळी वारीचे मेडल माझ्या गळ्यात होते. खुप मज्जा !! आपले नियम, आपली माणसं, आपली वारी आणि आपला पांडुरंग !! अजुन काय हवंय??

या सायकलवारीसाठी सर्व आयसीसी ग्रुपने जी काही मेहनत घेतली आहे त्याला तोड नाही. त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे आता हि सायकलवारी कधीही चुकवायची नाही.

बोला पुंडलिकवरदा हरीविठ्ठ्ल......!!!

समाप्त. 

- विजय वसवे