ICC Wari Part4 By Vijay Vasave

सायकलवारी भाग-४

            सर्व सायकलवारक-यांची वाट पाहत मी तिथेच थांबलो  (हॉटेल माऊलीप्रसाद, अकलुजफाटा). जे माझ्याकडुन प्रेरणा घेतात आणि मला जे प्रेरणा देतात अशा सर्वांची भेट घेतल्यानंतरच पुढे जायचे असे मी ठरवले होते. सायकलमुळे माझ्या आयुष्यात आलेली ही माणसे अतिशय अनमोल आहेत. सोशल मिडीयावर लाईक आणि कॉमेंटस करतच असतात पण प्रत्यक्ष भेट ही प्रत्यक्ष भेटच असते. जवळजवळ तीन तास माऊलीप्रसाद हॉटेलवर घालवल्यानंतर मी पंढरपुरकडे जाण्यासाठी सज्ज झालो. काही सायकलवारकरी ईंदापुरमध्ये जाऊन टेंभुर्णीकडे वळाले तर माझ्यासारखे आळशी सायकलपटु ज्यांना गुगल मॅप बघण्याचा कंटाळा येतो ते बायपास रस्त्याने सरळ पुढे निघाले. मोबाईलमध्ये गुगल मॅप दिलाय तो फक्त फॅशन म्हणुन...!

            अंदाजे ७० किमी अंतर शिल्लक राहीलेले होते. आता पुढचा हायड्रेशन पॉइंट होता टेंभुर्णी. तेथे पाणी आणि केळी मुबलक प्रमाणात उपलब्ध होती. आता येथुन विठुरायाची पंढरी अवघी ४५ किमी राहीली होती. आता आम्ही हायवेवरुन एका सामान्य रोडवर सायकल चालवत होतो. मला असे झाले होते की कधी एकदा पंढरपुर येतेय. कधी एकदा भीमा नदी पाहतोय. पांडुरंगाच्या मंदिराचा कळस बघण्यासाठी डोळे आतुरले होते. मला दर्शन मिळेल की नाही? की बाहेरुनच दंडवत घालावा लागेल? दर्शनाच्या रांगेत थांबलो तर किती वेळ लागेल? पायांना आराम मिळेल का? रांगेत थांबुन पाय थकतील, उद्या पुन्हा सायकल चालवायची आहे, कसे होईल? एवढया लांब सायकल चालवत येऊन विठ्ठलाचे दर्शन मिळाले नाही तर काय उपयोग? छे काहीच अर्थ नाही. काहीही होवो मी दर्शन घेणारच असे मी मनोमन ठरवले. पांडुरंगा, तुझ्या दर्शनासाठी काय पण... वाट्टेल ते करायचे पण दर्शन घ्यायचेच. पहाटे ३ वाजता दर्शनासाठी गेलो तर सकाळी ६ वाजेपर्यंत नक्की दर्शन मिळेल आणि सर्वांसोबत परतीची राईड सुरु करायला वेळेत परत येता येईल. अशी एक धाडसी योजना मनात आखुन ठेवली होती.             

पंढरपुर रस्त्यावर सायकल चालवायला लागल्यावर मी कुठे चाललोय हे सांगायची गरज लागली नाही. सायकलचा भगवा झेंडा सारं काही सांगुन जात होता आणि पंढरपुर जसेजसे जवळ यायला लागले तशी त्याची सोनेरी किनार आणखीनच चमकायला लागलेली होती. आपली मराठी भाषा वळवेल तशी वळते. मी कुठुन आलो? हा प्रश्न ब-याच जणांच्या मेंदुतील वळवळ वाढवत होता. जाऊ दे आपल्याला काय करायचंय म्हणुन पुढे निघुन जाणारे होते तसे हटकुन गाडी सायकलबरोबर घेऊन "कुठुन आला?" विचारणारे सुद्धा होते. पुणे ऐकल्यावर अविश्वासात्मक आश्चर्याने पुढचा प्रश्न विचारला जायचा, "कधी हलला होता?" हा प्रश्न मला कळायचाच नाही मी म्हणायचो,"हे काय अजुनही हलतोय, हलल्याशिवाय सायकल कशी चालेल?" प्रश्न विचारणारा अजुनच बुचकळ्यात पडत असे. त्यानी काय विचारले ते मला कळले नाही आणि मी काय सांगितले ते त्याला कळले नाही. पण नंतर मीच ओळखले कधी हलला म्हणजे तिकडुन सुरुवात कधी केली.             

रस्त्यावरच्या धडधडीने मागच्या चाकाचे मडगार्ड खिळखिळे झाले. तो खराब रस्ता पाहुन असे वाटले की अकलुजमार्गे गेलो असतो तर बरे झाले असते त्याबाजुने गेलो असतो तरीही अंतर तेवढेच होते. रस्ता खराब आणि काही ठिकाणी रस्त्याचे काम चालु होते. धडधडीला कंटाळुन एका ठिकाणी फोटो काढायला थांबलो. तहान सुद्धा लागलेली होती. पंढरपुर १५ किमीची पाटी होती. पाणी पिऊन बाटली ठेवेपर्यंत रस्त्याच्या पलीकडुन एक व्यक्ती माझ्याकडे चालत आला. कुठुन आला विचारले आणि म्हणाला चला चहा घेऊ. पांडुरंगाची ईच्छा समजुन मी सुद्धा त्याच्या सोबत गेलो. छोटेसे हॉटेल होते. चहावाल्याला त्याने माझ्यासाठी सर्वात भारी चहा द्यायला सांगितला. तोपर्यंत ७ ते ८ लोकांनी मला आणि माझ्या सायकलला गराडा घातला आणि जी प्रश्नांची सरबत्ती चालु केली ती विचारायची सोय नाही. हे काय, ते काय, केवढ्याची, कधी घेतली, किती वर्षे झाली, किती गियर, गियरमुळे चढावर पळते का, वजनाला एवढी हलकी कशी काय??..... असे अनेकानेक आणि काहीजण तर वाट्टेल ते प्रश्न विचारत होते. एका कपभर चहाच्या बदल्यात एवढे प्रश्न? माझ्या या वाक्याने पण खुप मोठा हशा झाला. त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा यथामती प्रयत्न केला आणि जाता जाता मी त्यांना एकच प्रश्न विचारला, "पांडुरंगाचे दर्शन मिळेल का आज?" सर्वजण म्हणाले ...मिळणार तुम्हाला, एवढी सायकल चालवत आल्यावर का नाही मिळणार? "रामकृष्ण हरी" म्हणुन मी त्यांचा निरोप घेतला. पुढे रस्त्याचे काम चालु असल्यामुळे थोड्या हालअपेष्टा झाल्या. पंढरपुरात पोचल्यावर थोडी शोधाशोध केल्यानंतर गजानन महाराज मठ सापडला. राहण्याची उत्तम व्यवस्था होती. तसेच जेवणही अल्प दरात उपलब्ध होते. आंघोळ केल्यानंतर पहीले जेवण उरकुन घेतले. आधी पोटोबा आणि मग विठोबा म्हणतात ते काही खोटे नाही. पण माझ्या विठुराया !! समजुन घे रे, एवढया लांबुन सायकल चालवत आल्यावर भुक तर लागणारच ना... पंढरपुरात बऱ्याच जणांचा सत्कार करण्यात आला. मी या गोष्टींपासुन जेवढे लांब राहता येईल तेवढे लांब राहतो.             

सर्व सायकलवारकरी एकत्र जमल्यावर एक अतिशय गोड घोषणा करण्यात आली, "सायकलवर आलेल्या सर्वांना थेट दर्शन मिळण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे, तरी सर्वांनी ९ वाजता तयार रहावे" अहाहा ... आनंद काय वर्णु मी.. ही घोषणा ऐकुन माझ्या आनंदाला पारावर उरला नाही. बरोबर नऊ वाजता सर्व जमलो आणि विठ्ठल मंदिराच्या पश्चिम द्वाराजवळ पोचलो. सर्वसामान्य रांगेतील भक्तांना थांबवण्यात आले आणि आम्हाला एखाद्या व्हीआयपीसारखा रांगेच्या मधोमध प्रवेश मिळाला. थेट दर्शन म्हणतात याला. मला एकदम अपराध्यासारखं वाटायला लागले. त्या सर्वसामान्य रांगेत मी असतो आणि असा कोणी व्हीआयपी मधे घुसला असता  तर मी काय प्रतिक्रिया दिली असती हे माझे जीवश्च कंठश्च मित्र लगेच ओळखतील. 

पांडुरंगाच्या गाभाऱ्याच्या अलिकडे एका स्तंभावर गरूडाची चांदीची प्रतिमा दिसली, त्या स्तंभाला दोन्ही हाताने घट्ट मिठी मारली आणि म्हणालो, "हे विनतापुत्र गरूड, जेव्हा मी हा देह सोडण्याची वेळ जवळ येईल तेव्हा कृपया आपल्या प्रभुंना तुझ्या पाठीवर घेऊन मला घ्यायला येण्याची कृपा कर, पंढरीत आलो आता मला यमाचे भय नाही परंतु तरीसुद्धा मला त्या यमाची फार भिती वाटते. कारण तो त्रैलोक्यातील असा गुंडा आहे जो स्वतःच्या बापालाही घाबरत नाही" गरूड प्रार्थना झाल्यावर मी हनुमानाचा शोध घेऊ लागलो. हे प्रभु, तुमचा लाडका हनुमान कुठाय? तुमच्या समोर, तुमच्या आजुबाजुला कुठेच दिसत नाहीये, हनुमान नाही असे कसे प्रभु? ज्या हनुमानाच्या हनुमतीय पद्धतीचा हे वारकरी अनुसरण करतात तो हनुमान पंढरपुरात नाही?"
पांडुरंगाचे दर्शन झाल्यावर तर मला करमेना... हनुमान हनुमान करत मी मंदीराभोवती फिरत होतो आणि तेवढ्यात माझी नजर हनुमानावर गेली. जय श्रीराम म्हणत हनुमानाचा चरणस्पर्श केल्यावरच पांडुरंगाचे दर्शन घेतल्याचे समाधान मिळाले. माता रुख्मिणी, देवी सत्यभामा तसेच  राधारणीचे दर्शन घेतल्यावर पश्चिम द्वारातुनच बाहेर  आलो.

दर्शन करून बाहेर आल्यावर सर्वांनी एकमेकांचे कुशलक्षेम विचारले. जवळजवळ सर्वांनाच सायकलच्या सीटचा  भयंकर त्रास झालेला जाणवत होता. सॅडल सोअर म्हणजे सायकलच्या सीटचा आंबट शौकीनपणा काय असतो ते सर्वांकडे पाहील्यावर जाणवत होते. आम्ही एकमेकांच्या दुःखावर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला. झोपण्याअगोदर सर्वांनी आपापल्या चड्डीमध्ये तेल आणि व्हॅसलिन थापुन घेतले. आज तर सोप्पा पेपर होता पण खरी परीक्षा तर उद्याच होती. ज्यांनी फक्त एका बाजुची राईड निवडली ते सुटले होते. मलाही वाटलं की फक्त एका बाजुची राईड निवडली असती तर फार बरे झाले असते. कधीकधी नको तिथे शौर्य दाखवण्याची खुजली माझी वाट लावते, याचे काय करावे तेच कळत नाही मला. एवढा दमलो होतो तरीपण फेसबुक आणि व्हाटसअपवर बराच वेळ घालवला, या सोशल मिडीया दुखण्याचे एक काय करावे ते कळत नाही. मोबाईलची स्क्रीन बंद केल्यानंतर कधी डोळा लागला ते कळलेसुद्धा नाही. 
क्रमशः 
जय हरी विठ्ठल 
- विजय वसवे