Cycle Wari Part 3 By Vijay Vasave

सायकलवारी भाग- ३

 हडपसरमधुन ऊशिरा सुरुवात केल्यामुळे बरेचसे शहामृग प्रकारातले सायक्लिस्ट फार पुढे गेलेले होते. त्यांना पकडता पकडता नाकी नऊ आले. टेलविंड मस्त वाहत होता.  म्हणजे पाठीमागुन वाहणारा वारा. त्याच्यामुळे सायकल जरा जास्तच जोरात पळत होती. आता मला शेपूट नसतानाही या पार्श्वभागाकडुन वाहणा-या वा-याला टेलविंड का म्हणायचं हा मला पडलेला प्रश्न. काहीही असो तो बेभान टेलविंड मला फार आवडला. त्याच्यामुळे जीपीएसमध्ये दिसणारा स्पीड सहजपणे ३५ च्या वर जात होता. जीआरएल टायर म्हणजे रोलिंग वगैरे त्याच्या गावातही नाही, ज्याचा स्वभावच दगडाचा आहे त्याच्याकडुन रोलिंगची अपेक्षा कशी ठेवायची? असे असुनही सोलापुर हायवेवर सायकलला मिळणारा वेग थक्क करणारा होता. या टेलविंडच्या कुबडया घेऊन सोलापुर रोडवर सायकल चालवण्याचा सराव केला तर मी फार वेगात सायकल चालवतो असा भ्रमाचा भोपळा तयार व्हायला वेळ लागणार नाही. कवडीपाट, लोणी, थेऊरफाटा, कुंजीरवाडी ही सर्व मित्रांची गावे. कॉलेजात असताना या मित्रांकडे ब-याचदा येणे-जाणे असायचे तसेच मुक्कामही असायचा. सध्या आम्ही सगळे सोशल मिडीयावर एका ग्रुपमध्ये बंदिस्त आहोत. भेट नाही, संवाद नाही फक्त व्हाटसअपवरचा कचरा ईकडचा तिकडे करत असतो. मी सोलापुर रोडने चाललोय याची कोणाला खबर लागु दिलेली नव्हती. नाहीतर यांनी विजयभाऊंचे स्वागत करण्यासाठी तोलनाक्यावरच राडा केला असता. एनर्जी ड्रिंक म्हणुन व्हिस्की घेऊन आले असते आणि जाता जाता एक नायंटी तरी घेऊन जा अशी गळ घातली असती. आषाढी एकादशी यांच्यासाठी तोंड दाबुन बुक्क्यांचा मार असतो कारण सर्वांचा उपवास आणि सगळीकडेच फराळाचे पदार्थ केलेले असतात म्हणुन. आणि मी वर्षातील सर्व एकादशी करणारा, महाभारतातील अनुशासन पर्वामध्ये १४१व्या अध्यायात भगवान श्रीकृष्णाने सम्राट युधिष्ठीराला एकादशीच्या व्रताचे जे नियम सांगितले आहेत ते सर्व जसेच्या तसे पाळणारा. आता मित्रच आपले असे आहेत तर काय करणार. जाऊ द्या सध्या हा विषय नको. पार्टीच्या वेळी पार्टी, सायकलिंगच्या वेळी सायकलिंग आणि भक्तीमार्गाच्या वेळी फक्त भक्तीमार्ग. एकावेळी एकच नशा करावी आणि सायकलिंग ही माझ्यासाठी एक नशाच आहे. किंबहुना त्याहुनही जास्तच. यातसुद्धा ९०किमी, १८०किमी हे आकडे असतात. पण आकडे जरी तेच असले तरी यातुन मिळणारी नशा मात्र वेगळी.

 वा-यावर स्वार होऊन चाललेलो असताना मला संतोष झेंडे भेटला (सासवडचा पीटर सॅगन). आम्ही एकत्रच कामाला आहोत. संतोष आणि डॉ. अक्षय गप्पा मारत चालले होते. त्यालाही मी वा-यावर स्वार व्हायला लावले आणि आम्ही दोघे हवेशी गप्पा मारत चौफुल्याला पोचलो. येथे सर्वांसाठी नाष्ट्याची सोय करण्यात आलेली होती. सदगुरु वडापाव सेंटरवर गरम गरम वडापावचा आस्वाद घेतला. जम्बो बटाटावडा काय असतो हे मला तो वडा पाहील्यावर समजले. एका वडयाबरोबर दोन पाव खाल्ले तरीही वडा शिल्लक राहीला होता. जर तुम्ही सोलापुर रोडने जाणार असाल तर वडापाव खाण्यासाठी ईथे अवश्य थांबावे असे हे हॉटेल आहे. ज्याला वडापाव आवडतो तो ईथे थांबणारच. चौफुल्याला तोरणा मिसळच्या अगदी जवळ आहे. आयसीसीच्या प्रत्येक राईडमध्ये स्वयंसेवकाची भुमिका बजावणारी रुतुजा यावेळेसही स्वयंसेवक म्हणुन हजर होती. तिने मला दोन चिक्क्यांची पाकीटे दिली ती मी जर्सीच्या मागच्या खिशात ठेवली. आयसीसीकडुन या पंढरपुर सायकलवारीसाठी जी जर्सी देण्यात आली होती तिला पाठीमागच्या बाजुस भलेमोठे ३ खिसे होते जे मला खुप आवडले. यावरुन ओळखायचे की ही जर्सी सायकल चालवणा-यानेच बनवलेली आहे आणि आयसीसीमध्ये सायकल चालवत नाही असा एकही सापडणार नाही.

 नाष्टा झाल्यावर सासवडच्या पीटर सॅगनने मला गुल्ल्या दिला म्हणजे कुठे गायब झाला काय माहीत. अद्वैत खटावकर मोठया जाड टायरची एमटीबी घेऊन आला होता. एवढा मोठा ट्रक का घेऊन आलास? असे मी त्याला विचारले सुद्धा. आतापर्यंत ६५ किमी अंतर पार झालेले होते. आता पुढचा थांबा हॉटेल माऊलीप्रसाद, अकलुजफाटा. ते अंतर जवळजवळ ८० किमी होते. आज वा-याशी युती झालेली असल्यामुळे मी कोणत्याही अंतराला घाबरत नव्हतो. पण हाच वारा उद्या जेव्हा विरोधी पक्षात ऊभा राहील तेव्हा आमची चांगलीच दाणादाण उडवणार हेही मला चांगलेच ठाऊक होते कारण मी एकदा याच्या विरोधी पक्षात जाण्याने काय वाट लागते याचा अनुभव घेतलेला आहे. चौफुल्यापासुन मी जे सुसाट सुटलो ते थेट पळसदेवाचे अर्धवट पाण्यात बुडालेले मंदिर दिसल्यावरच थांबलो. थोडा दम घेतला, पाणी प्यायलो आणि फोटो तसेच व्हिडीओ काढुन सोशल मिडीयावर अपलोड केले. सायकलचे फोटो सोशल मिडीयावर टाकल्याशिवाय मला चैन पडत नाही. सायकल म्हणजे मेरे दिल का चैन आहे, "ओ मेरे....दिल के चैन...." अशी गाणीही गुणगुणतो मी तिच्यासाठी. "सायकलसे प्यार करो, दिल टुटेगा नहीं..ये गॅरंटी होती है" एकवेळ बायको सुद्धा काहीतरी कुरबुर काढुन भांडण करेल पण सायकल असे काहीही करत नाही म्हणुन सायकलवर प्रेम करा. मी तर माझ्या सायकलवर जीवापाड प्रेम करतो. 

 बरोबर ११ वाजुन ८ मिनिटांनी अकलुज फाटयावरील माऊलीप्रसाद हॉटेलवर पोचलो. हायवेवर मुख्य चौकात मोठा भगवा झेंडा लावलेला होता तिथुनच उजवीकडे वळाल्यावर माऊलीप्रसाद हॉटेल होते. सायकल चालवणारे एवढ्या लवकर ईथे पोचतील अशी त्यांनी अपेक्षाच केलेली नव्हती. त्यांची काहीच तयारी नव्हती. तोपर्यंत रुतुजाने माझे छान फोटोशुट करुन दिले. थोड्यावेळाने जेवणाची तयारी झाल्यावर डाळ-भातावर आडवा हात मारला आणि मित्रांची वाट पाहत थांबलो. 
क्रमश:
जय हरी विठ्ठल  
- विजय वसवे