Cycle Wari Part 2 By Vijay Vasave

सायकलवारी भाग-२

 इंडो सायक्लिस्ट क्लबने पंढरपुरला जाणारी ही अनोखी सायकलवारी आयोजित केली होती. आयसीसी म्हणजे पर्यावरणाची काळजी घेण्याचा वसा घेतलेली माणसे. सायकलिंग आणि रनिंग या खेळांचा जास्तीत जास्त आनंद घेता यावा म्हणुन वर्षभर आयसीसी अनेक स्पर्धांचे आयोजन करत असते तेही पाश्चिमात्य विचारांचे घोंगडे न पांघरता हे विशेष. इतर व्यवसायिक संस्थांप्रमाणे नफा कमावणे हा यांचा उद्देश अजिबात नसतो. समाजातील सर्व स्तरातील व्यक्तींना एकत्र सामावुन घेत अतिशय सुंदर आयोजन करत असतात हा माझा अनुभव आहे. या आयसीसी परीवाराचा मी सुद्धा एक भाग आहे हे मी माझे भाग्य समजतो.

   शनिवार ७ जुलै रोजी सायकलने पंढरपुरला जायचे होते आणि या आठवडयाच्या सुरुवातीपासुनच पुण्यामध्ये पाऊस शिंतोडे उडवत होता, हो म्हणजे रस्ता ओला करणे वगैरे. अगदीच मुसळधार नाही पण सायकल चालवली तर पाठीवर नक्षी येण्याईतपत तर नक्कीच रीपरीप चालु होती आणि पुन्हा सायकल पाण्याने भिजणार तसेच चिखलाने माखणार ते वेगळेच. पाऊस नको पडु दे असे म्हणण्याचा दुष्टपणा मी पहील्यांदा माझ्या आयुष्यात केला असेल पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. माझ्या म्हणण्याला विचारतो कोण? रस्ता ओला होता, आभाळाकडे नजर टाकल्यावर पावसाची दाट शक्यता जाणवत होती म्हणुन मी रोडबाईक घरीच ठेवुन हायब्रीडने पांडुरंगाच्या दर्शनाला जाण्याचा निर्णय घेतला. एकच उद्देश की रोडबाईकला पावसाच्या पाण्याचा एक थेंबही लागता कामा नये. हायब्रीड म्हणजे माझी ट्रेक जिच्या सोबत मी अनेक मोठमोठ्या राईडस केल्या, जिच्यावर स्वार होऊन मी अटकेपार झेंडे फडकवले ती माझी लाडकी ट्रेक. ती सध्या काय करते? विकायची आहे का? असे प्रश्न बरेचजण विचारतात. जीवापाड प्रेम करतो मी तिच्यावर आणि आजपर्यंत तिने माझी साथ कधीही सोडली नाही. तिला विकणे शक्य नाही. आणि सध्या ती होम ट्रेनरवर असते. ट्रेनरवरुन खाली घेतानाच ती कुरकुरायला लागली होती, "आता कशी माझी गरज लागली हं? त्या चिकनीला काय झाले? एवढीशी रीपरीप सोसत नाही का तिला?" रोडबाईकवरची सर्व भडास तिने दोन-तीन वाक्यात बाहेर काढली. कशीबशी तिची समजुत काढु लागलो आणि शेवटी लब्यु म्हटल्यावरच यायला तयार झाली. तरीपण जीआरएलचे टायर नकोच म्हणत होती, मला वेगात पळता येणार नाही असे तिचे म्हणणे होते. पण माझ्याकडे टायर बदलायला वेळच नव्हता.

 सौ. ने नेहमीप्रमाणे भल्या पहाटे ऊठुन सर्व तयारी करुन दिली आणि आंघोळ न करता जातात का पांडुरंगाच्या दर्शनाला? असे धमकावत भल्या पहाटे आंघोळही करायला लावली. या धमकावण्यात पण एक गोडवा असतो. पहाटे साडेचारला मी घर सोडले आणि पाच वाजुन पाच मिनिटांनी हडपसरला फ्लॅग ऑफच्या ठिकाणावर पोचलो. माझ्याअगोदर तिथे बरेच सायकलवारी हजर झालेले होते. सर्वांना भेटलो गप्पाटप्पा झाल्या. निगडीवरून आलेल्यांच्या सायकलला भगवा झेंडा पाहील्यावर कधी एकदा माझ्या सायकलला भगवा लावतोय असे झाले होते. भगवा दिसला की एक वेगळाच ऊत्साह अंगात संचारतो. ऊत्साह तर सर्वांच्याच अंगात संचारलेला होता. पाठीवरची सॅक ट्रकमध्ये फेकली (सॅकला माझे नाव असलेली पाटी लावली) आणि पॅडलवर पाय ठेवुन आमच्या ग्रूपच्या फ्लॅग ऑफची वाट पाहु लागलो. मी एच ग्रूपमध्ये होतो आणि गिरीश कुलकर्णी आमचे लिडर होते. H-284 माझा बिब नंबर. फ्लॅग ऑफ झाल्या झाल्या मी सुसाट निघालो. वाऱ्याच्या तालावर जो वेग मिळत होता ना.. अहाहा.. काय सांगु... मी तरंगतच लोणी काळभोरला पोचलो. 

क्रमशः
 
जय हरी विठ्ठल 
- विजय वसवे