Cycle Wari Part 1 By Vijay Vasave

सायकलवारी
भाग-१

पूर्व पुण्य असे जयाचिये पदरी ।
तोचि वारकरी पंढरीचा ।

वारकरी पंढरीचा |
धन्य धन्य जन्म त्याचा |

 माझ्या आयुष्यात मी एकदाही पंढरपुरला गेलेलो नव्हतो. आहे की नाही कमाल? केवढा हा करंटेपणा! जे प्रत्यक्ष भुलोकीचे वैकुंठ, जिथे साक्षात परब्रम्ह, परमेश्वर, वासुदेव श्रीकृष्ण पांडुरंगाच्या रुपात कमरेवर हात ठेवुन ऊभे आहेत त्यांच्या चरणावर माथा टेकवण्यासाठी मी अजुनही गेलेलो नव्हतो. याची खंत तर वाटणारच. खंत काय एखादे शल्य बोचत असल्यासारखे वाटायचे. मागच्या जन्मीची पापे याला कारणीभुत असावीत त्यामुळेच पांडुरंगाच्या भेटीला एवढा ऊशिर झाला. वृंदावन, मथुरा तसेच अयोध्या याठिकाणी जाऊन आलो पण नेमके पंढरपुरच राहीले होते. ज्या भुमी प्रदेशात जन्म होतो, तेथील राजा, तेथुन वाहणारी नदी आणि त्या प्रदेशाच्या सर्वात जवळ असणारे तिर्थक्षेत्र यांना मनुष्य जन्मामध्ये अनन्यसाधारण महत्व असते. सर्वात जवळचे तिर्थक्षेत्र पंढरपुर आणि कमरेवर हात ठेऊन ऊभा असलेला श्रीहरी पांडुरंग माझे दैवत आणि आपणा सर्वांची माऊली. हिच माऊली दक्षिणेत श्री बालाजी, पुर्वेस श्री जगन्नाथ, उत्तरेत स्वत: बांकेबिहारी श्रीकृष्ण आणि पश्चिमेस श्रीनाथजी बनुन युगानुयुगे ईतर भक्तांनाही दर्शन देत आहे. हजारो वर्षांपासुन त्या त्या प्रदेशातील लोक भगवंतांच्या विवीध रुपांचे दर्शन घेत आहेत. आपली वारी आणि पालखी त्याच परंपरेचा एक भाग. हल्ली दळणवळणाची साधने एवढी प्रगत झाली आहेत की आपण भगवंतांच्या सर्व प्रदेशातील या सर्व रुपांचे दर्शन  अल्प कालावधीत घेऊ शकतो. पुर्वीसारखा पायी प्रवास किंवा बैलगाडीत जाण्याची आवश्यकता राहीलेली नाही. परंतु आपल्या ईथे अजुनही संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या पादुका बैलगाडीतुन पंढरपुरला नेण्याची परंपरा अखंडपणे जोपासलेली आहे नाहीतर आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी संत ज्ञानेश्वर आणि जगद्गुरु संत तुकारामांच्या पादुका हेलिकॉप्टरमधुन पंढरपुरला नेऊन दुपारपर्यंत पुन्हा त्यांच्या जागेवर आणुन ठेवता येतील. हो, हे शक्य आहे. म्हणजे दळणवळणाच्या साधनांचा फायदाच जर घ्यायचा असेल तर आपण असे करु शकतो पण असे करण्यात काहीही अर्थ नाही. मग पालखी, वारी, दिंडी याला काहीही अर्थ उरणार नाही. भक्तांना पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपुरला चालत जाताना ज्या दिव्य आनंदाची अनुभुती होते ती होणार नाही. वारीचा आत्माच हरवुन जाईल. 
 अलिकडच्या काळात सायकलच्या तंत्रज्ञानातही बरीच प्रगती झालेली आहे. कमी वेळात लांब पल्ल्याचे अंतर कापणे शक्य झालेले आहे. कमी वेळात म्हणजे सकाळी पुण्यातुन निघाल्यावर संध्याकाळी पंढरपुरमध्ये पोचणे. सायकलवर पंढरपुरला जाणे म्हणजेच सायकलवारी. तर अशी हि आमची सायकलवारी विठुरायाच्या पंढरीचा महीमा अनुभवण्यासाठी ७ जुलैला रवाना होणार होती. पंढरपुरला गेल्याशिवाय या मनुष्यजन्माला अर्थ नाही आणि गतिही नाही. 
क्रमश:
जय हरी विठ्ठल
- विजय वसवे