LONDON EDINBURGH LONDON 2017 by Dr.Chandrakant Harpale

LONDON EDINBURGH LONDON 2017

DREAMING 2021

 

"Your visa is rejected". असे पत्र हातात पडताच पायाखालची वाळू सरकली. हातामध्ये सहा दिवस होते. कागदपत्रातील त्रुटी दुरुस्त करून मुंबई गाठली. Special priority  catagary मधे apply करुन एक दिवसात व्हिसा मिळाला. २४ जुलैच्या संध्याकाळी पुणे दिल्ली व पहाटे तेथून लंडन ला प्रयाण केले. हिथ्रो विमानतळावर ऊतरताच तेथील हवामान चांगलेच थंड होते. आमचा मुक्काम Illford येथील हाँटेल St Georgio मधे होता.

 येथे हॉटेल जवळ असलेल्या Yellow Box नावाने असलेल्या गोडावून मधे सायकलींसाठी रुम बुक केली होती. परंतु मागील ३ महिन्यापूर्वी झालेल्या बाँबस्फोटामुळे तेथील रहिवासी प्रमानपत्र असल्याशिवाय ते तेथे सायकल ठेवू देत नव्हते. शेवटी ६तास बाहेर थांवल्यावर दुपारी डॉ डोळस सरांचे ओळखीचे आले आणी सायकली गोडावून मधे ठेवल्या.

हॉटेल जवळच असलेल्या "मंत्रा " रेस्टोरंट मधे आम्ही खानावळच लावली होती. मंत्रा चा मालक स्त्रीलंकन, आचारी साऊथ इंडियन आणी मँनेजर पुणेकर. लंडन मधे असेपर्यंत आम्ही मंत्रा मधे जनुकाही मेसच लावली होती. पहिले ३- ४ दिवस रोज सकाळी जवळच असलेल्या Valentine Park मधे  Running, Stretching करत होतो. दुपारी जवळच असलेल्या सायकल स्टोअर्समधुन गरजेच्या गोष्टी खरेदी करणे, असा दिनक्रम होता. २ दिवस सायकलींग चाही सराव केला. २९ तारखेला रेस चे starting point ला जावून registration करने.drop bag देणे अशा formality पूर्ण केल्या. रात्री लवकर जेवन करुन झोपेची गोळी खाऊन झोपी गेलो.

           ३० तारखेला हॉटेलपासून १५ किलोमीटर असलेल्या starting point ला सायकलवरच गेलो. नाष्टा करुन १० वाजुन २० मिनीटानी starting line  ला आलो. येथे १६७२ रायडर्स ना दर १५ मिनीटानी ५०-५० चे ग्रुपने सोडत होते. पुढच्या कंट्रोल ला registration,  जेवन व विश्रांतीसाठी गर्दी होवू नये हा त्यांचा सदहेतू. " छत्रपती शिवाजी महाराज की जय "  च्या जयघोषाने आसमंत दणदणला. १०.३० ला आमच्या Q गटातील ५० जणांना flag off मिळाला आणी इतरांबरोबर आम्ही १२ पुणेकरही निघालो. 

St lives (100 km )

पहिला कंट्रोल १०० किमी होता. सुरुवातीपासूनच रस्ता उंच सखल (rolling  ) व Rough surface असलेला होता. ऊच्च वेगाच्या गाड्या पाऊस व बर्फात घसरु नयेत म्हणून रस्ते खरबरीत ठेवण्यात आले असावेत. सवयीप्रमाने एकच थांबा घेत आम्ही पहिल्या कंट्रोल ला ३.३० ला पोहोचलो. तेथील सत्तरीतले तरुण स्वयंसेवक सर्वांचे ऊत्साहात स्वागत करीत होते. चहा, कॉफी, जेवन पाणी याची आस्थेने चौकशी करत होते. तेथे २० मिनीटाचे offsidal timing चे  target एक तासावर कसे गेले कळालेच नाही.

Louth ( 161) 

दुसरा कंट्रोल  ६१ किमी वर होता. मी आणि दशरथ जाधव साहेब ( एस पी  ) निघालो. तेथेही खाद्य पदार्थावर ताव मारला. त्याठिकाणी आमच्याकडे चार तास बफर टाईम शिल्लक होता. 

Louth (244) 

. जाताना रस्त्याचे दोन्ही बाजुला खूप मोठे मोठे गव्हाची शेती मळे व मका शेती होती. तेथे शेती कामगार मिळत नाहीत. मुख्यता यांत्रीक शेती करतात. येथे मिळणारी पालेभाजी आयात करतात. येथे वर्षभर पाऊस पडतो त्यामुळे सिंचन यंत्रणा नाही. लाऊथ ला रात्री १२.१० ला पोहोचलो. येथे जेवणासाठी मोठी रांग होती. टेबलावर बीफ, पोर्क आणि ऊकडलेले बटाटे होते. बाकीचे जेवण घेईपर्यंत मी १५ मिनीटे पावरनँप घेतला. बीफ, पोर्क कोणीही घेतले नाही. ऊकडलेल्या बटाट्यावर शेंगदाना चटनी टाकून ती आम्ही घरुन नेलेल्या चपाती बरोबर खाल्ली. ( नीरसे दुधात कणीक मळून कमी तेल लावून बनवलेल्या चपात्या थंड वातावरणात  १२ - १५ दिवस टिकतात. - ईति गुरुवर्य दशरथ जाधव साहेब ) 

Poklingtom (341)

येथे तपमान ४-५ डिग्री असावे. येथून थंडी जाणवायला खरी सुरुवात झाली. मानेवर एक, डोक्यावर दुसरा बंडाना, वरुन माकडटोपी, त्यावर हेल्मेट. अंगात बनियन, वर दोन लेयर गरम कपडे, त्यावर सायकलिंग जर्सी. पायात लेग वार्मर असा पोषाख करुन आम्ही सायकलींग ला सुरुवात केली. पहाटे झोप कंट्रोल होईना. शेवटी रस्त्याच्या कडेला एका घरासमोर पहाटे अर्धा तास पाठ टेकविली. अर्धातासाने जाधव साहेबांनी ऊठविले आणी आम्ही लगेच पुढे निघालो. पुढे जगप्रसिध्द हंबर पुल लागला. ( 8th longest single span suspension bridge 2210 meter long with 1410 meter central span ). पुलावर हवा एवढी प्रचंड होती कि सायकल चालविणे मुश्किल झाले होते.

       पोकलिंग्टम कंट्रोल ७ किमी राहिला होता. आम्ही एका राज्य महामार्गावरुन जात होतो. समोरुन एक कार वेगाने येत होती . माझे पाठीमागुन एक काराव्हँन वेगाने येत होती. रस्ता दुपदरी होता. कार ला वाचविण्याच्या प्रयत्नात काराव्हँन मला अगदीच जवळून गेली. ती इतकी वेगात होती कि तिच्या हवेने मी रस्त्याच्या कडेला पडलो.   माझे सायकलचा डिलेरल हँगर बेंड झाला नि माझे सायकलचे गीअर पडणे बंद झाले.( माझी सायकल कार्बन फायबर ची असल्याने सायकल उजव्या बाजूला पडल्यास सायकल ला इजा होवू नये म्हणून डि हँगर अँल्युमिनीयम चा असतो.) आता वाटले सगळे संपले. पण मग हळुच डि हँगर थोडा बाहेर ओढला नि २-१ गीअर वर सायकल चालू लागली. त्याचवेळी जोरदार पावसाला सुरुवात झाली. तेवढ्याच गीअर वर सायकल कंट्रोलपर्यंत घेवून गेलो. तेथील टेक्निशियन ने हँगर ओढल्यास त्याचे २ तुकडे होतील असे सांगीतले. त्याने शक्य तेवढा सरळ केला तसे सर्व गीअर पडू लागले. यामधे एक तास गेला. तोपर्यंत पोटात थोडे अन्न कसेबसे ढकलले. 

Thirsk(407)

पोकलिंग्टम वरुन पुढे निघालो. येथे जाधव साहेबांचा हँमस्ट्रिंग दुखावला. ते रेस सोडण्याच्या तयारीत होते. परंतु त्यांनी stretching करुन परत तयार झाले. येथे खरा चढ ऊतार चालू झाला. एक एक चढ एका छोट्या टेकडी एवढा होता. ऊताराला आम्ही मिळविलेला स्पीड चढाला टिकत नव्हता. २-३ वेळा अक्षरशः आम्ही ऊतरुन चाललो. याठिकाणी कँसल हॉवर्ड च्या दोन सुंदर कमानीमधून प्रवास केला. परंतु कँसल हॉवर्ड दिसला नाही. आमचा avarage speed 10 वर आला. टेक्निशियन ने अगोदर सांगितल्याप्रमाने चढ चालू होण्यापूर्वी मला आधीच गीअर चेंज करून ठेवावे लागत होते. कोणत्याही परिस्थितीत चढाला गीअर चेंज न करण्याचे सांगीतले होते. त्याने चेनवर लोड येवून हँगर तुटण्याची शक्यता होती. . येथे रस्ता दोन शेताच्या मधून होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला दाट झुडूपांचे कुंपन होते. अंदाजे ५० फूट अंतरावरुन २ मोठी हरण रस्ता ओलांडून दुसय्रा शेतात गेली. थोडे अंतर गेल्यावर पुन्हा ती हरणे रस्ता ओलांडून जावू लागली. एस पी नी ब्रेक दाबला. मी जवळ जवळ त्यांना जावून धडकलोच असतो. एस पी नी ब्रेक नसता दाबला तर एक हरिण त्यांना बाजूने धडकलेच असते. पुढे आम्ही थस्क ला पोहोचल्यावर तेथील टेक्निशियन कडून पुन्हा सायकल चेक करुन घेतली. 

Barnard castle (472)

थस्क ला जेवन करुन आम्ही लगेच पुढे निघालो.थस्क पासून आमचे एक सहकारी दिनेश मराठे रस्ता चुकले. एका ब्रिटीश नागरिकाच्या मदतीने २ तासांनी त्यांना शोधले. यामधे आमचे २ तास वायाला गेले. आम्ही एका लाकडी ब्रीजवरून प्रवास केला. रात्री दहा वाजता बर्नाड कँसल ला पोहोचलो. बर्नाड कँसल एक जुना राजवाडा वजा किल्ला आहे. याठिकाणी जेवन करुन सर्वानी एक तास झोपायचे ठरविले.

Brompton (556)

थंडी मी म्हणत होती. फरशीवर अंग टेकविले १० मिनिटात इतका काकडलो की ऊठून २ बेंच एकत्र करुन त्यावर झोपलो. रात्री साडे बाराला निघालो. पावर बँक व केबल विसरल्याने पुन्हा ४ किमी चा फेरा पडला. रात्री अंधारात दिड तास घाटरस्ता चढत होतो. पण काही अंदाज येत नव्हता. 

     साधारणतः रात्री अडीज वाजता गीअर शिफ्ट करत असताना माझा डि हँगर बेंड होवून चाकात शिरला. आता सर्व संपले. रेस सोडत असल्याचा मेसेज कंट्रोलला पाठविला. पित्यासमान जाधव साहेब सोडून जायला तयार नव्हते. 

साहेबांना विनंती करुन पुढे पाठविले. आता अशीतशीही रेस सोडावी लागनार, म्हणून तुटला तर तुटला मी हँगर बाहेर ओढला. अर्धा तासाच्या प्रयत्नानंतर  १-३, १-४, १-५, १-६ असे चार गीअर पडू लागले. राईड सुरु ठेवत असल्याचा कंट्रोल ला फोन करुन पुन्हा पुढे निघालो. दिनेश मराठे व साहेब पुढे भेटले. काही अंतर गेल्यावर पुन्हा पाऊस सुरु झाला. खूपच थकल्याने मला सायकलवरच झोप यायला लागली. भर पावसात एक दाट झुडूपाखाली सुकी जमीन दिसली. मी जाऊन झोपलो. माझे शेजारी दिनेश येवून झोपला तोही तापाने फणफणला होता( viral fever) तसेच दिल्लीचा एक रायडर येवून झोपला. एक तासभर विश्रांतीनंतर दिनेशलाही ऊठविले. सरळ सायकलवर बसुन  पुढे निघालो. पाऊस चालूच होता.      येथून याडमॉस" घाट चालू झाला. 31 किमी चा हा घाट एकच थांबा घेत चढलो १-३ या गीअरवर. घाट संपताच अलस्टोन नावाचे गाव लागले. येथे नाष्टा व विश्रांतीसाठी असलेला कंट्रोल बंद झाला होता. येथील 200मीटर रस्ता तीव्र उतार व घडीव दगडांपासून बनविलेला खरबरीत होता. तेवढे अंतर चालतच गेलो. कंट्रोल बंद झाल्याने मी व दिनेशने तेथेच पेट्रोल पंपावरील सुपर मार्केटमधे कॉफी व बिस्किट घेतली. ३-४ डिग्री तपमान आणि मागे दोन तास पावसात भिजल्यानंतर मिळालेल्या कॉफीविषयी तुम्हीच कल्पना करा. कॉफीने ताजेतवाने झाल्यावर मग नॉनस्टाप ब्रॉमटन ला पोहोचलो. 

मोफोट- येथून पुढे आम्ही स्कॉटलंट मधे प्रवेश करत होतो.  ब्रामटन ला गेल्यावर लगेच तेथील टेक्निशियन ने शक्य तेवढा डि हँगर सरळ केला. तोपर्यंत मी माझी पँट बदलली. थोडे पटकन खाल्ले. जाधव साहेब, मी व झांजुर्णे सर निघालो.     पुढे कार्लाईल नावाचे गाव लागले. तेथे डि हँगर शोधन्यात एक तास गेला. पण मिळाला नाही. तसे च माझा मित्र डॉ संदीप  शेवाळे याला फोन केला. त्याने शक्य तेवढ्या ओळखीच्या दुकानांमधे फोन करुन विचारणा केली. ऑनलाईन पाहिले पण कोठेही मिळाला नाही. माझे साडू सुमीत टकले यांनी लंडन मधून ऑनलाईन ईडेनबर्ग ला हँगर बुक केला परंतु ते दुकान आठ वाजता बंद होणार होते. तोही मार्ग बंद झाला. रस्ता अतिशय खरबरीत होता. पुढे लॉकरबी नावाचे गाव लागले . दुसरे जागतीक महायुध्दाविषयी या गावच्या आठवणी आहेत. गीअर दुरुस्त करुनही फारच कमी गीअरवर सायकल चालू होती. कमी गीअरवर सायकल चालवून फार थकून जात होतो कारण चढऊताराचा फायदा घेता येत नव्हता. तसेच आडवा वारा ( cross wind ) खूप होती. आमचे पुणेकर टेक्निशीयन कैलास पवार सर सतत संपर्कात राहून सूचना देत होते. 

एडेनबर्ग  ( Edenburgh 710 ) -मोफोट ला डॉ संदिप वाट पहात होते. अशाही बिकट अवस्थेत मोफोट ला आलो त्यांनी आनंदाने अलिंगन दिले. तेथील टेक्निशीयन सायकल सोपवून आम्ही एकत्र नाष्टा केला. टेक्निशीयन ने जुजबी दुरुस्ती करुन सर्व गीअर चालण्याची हमी दिली. डॉ संदीप  शेवाळे या वर्षीचा रँम ( RAAM ) फिनिशर आहे. तो ग्लासगो वरुन भेटायला आला होता.  परत त्याची भेट घेवून पुढे निघालो आणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पावसाचा जोर ओसरताच पुढे निघालो. येथे १५ किमी चा डेव्हिल्स बीफटब (Devils Beeftuf ) नावाचा घाट लागला.  तेथून पुढे मात्र चढऊतार होता. सर्व गीअर काम करत नव्हतेच. एडेनबर्ग चे १५ किमी अगोदर रस्ता खूपच चढउताराचा होता. पुढे ८-१० किमी रस्ता दोन शेताच्या बांधावरुन होता. ४-५ फूट रुंद रस्त्यावर चिखलमाती होती. शेवटचा ४-५ किमी रोड अतिशय फसवा होता. रस्ता न सापडल्याने पुढे सहा जण ऊभे होते. जीपीएस लावून स्थानिकांची मदत घेवून रात्री साडे दहाला कंट्रोल ला पोहोचलो. 

ईनरलीदन- (Innerleithen 753) 

एडेनबर्ग ला जेवण करुन दोन तास झोप घेतली. थंडी फारच होती. मी जाधव साहेब व दिनेश निघालो. थोडे अंतर गेल्यावर ३ जण रस्ता शोधत असलेले दिसले. रात्रीचे अंधारात जीपीएक्स, गार्मीन चे सहाय्याने रस्ता शोधत पुढे निघालो . सर्व चढच होता. २४ किमी चा घाट चढण होती . पहाटेची झुंजू मुंजू झाली होती. एडेनबर्ग शहराचे वैभव डोळ्यात साठवून पुढे निघालो. पुढे रस्ता चढऊतार होता. रस्ता एका नदी चे बाजूने होता. थंडी मी म्हणत होती तपमान मायनस मधे होते. येथे कंट्रोलला पोहोचलो. तपमान -३ होते. 

एस्कडेलमूर- ( Eskdalemuir 802)

ईनरलीदन ला जाधव साहेबांचा पायच वाकेना. ( Hamstring stretch) त्यांनी येथेच रेस सोडली. तेथील संयोजकांशी बोलून जाधव साहेबांना लंडन ला परतण्याची व्यवस्था करण्याची विनंती केली. मग मी व दिनेशने गरमागरम कॉफी व केक घेतले. खाऊन एक एक बरोबर घेतला. कंट्रोल वरुन बाहेर पडल्यावर रस्ता शोधायला अर्धा एक तास गेला. दोन घरांच्या मधून एका छोट्या गल्लीतून पलीकडे एका नदीवरील पादचारी पुलावरुन रस्ता पुढे होता. रस्ता तीव्र चढाचा होता. उतरुन चालावे लागले. ईनरलीदन ते एस्कडेलमूर रस्ता जंगलातून होता. तीन वेळा डोंगर चढऊतार करायचा होता (2-3 वेळा पसरणी घाटाएवढा) . खरबरीत रस्ता असल्याने प्रयत्न करुनही स्पीड वाढत नव्हता. गायी, मेंढ्या व  लाकडे घेवून जाणारे ट्रक्स सोडले तर रस्त्यावर चिटपाखरुही नव्हते. स्कॉटलंड मधे काहीही पीकत नाही. सुरु ची झाडे सोडली तर काहीही दिसत नव्हते. येथील लोक बहुतेक पूर्वपुण्यायी वर जगत असावेत. पुढे मुंबईची रायडर डॉ शर्वरी खरे दिसल्या. त्यांचा मोबाईलची बँटरी पूर्ण ऊतरलेली, रुट शीट नाही. अशाही अवस्थेत त्या सायकल चालवत होत्या. एकट्या स्त्रीने परदेशात कोणत्याही साधनाशिवाय जंगलात सायकल चालवणे, आपण फक्त कल्पना करा ।। त्यांना मग आम्ही रुट शीट दिली. त्यांच्याकडे मोबाईल ची केबलही नव्हती.  आमच्या जवळची केबल त्याला बसली नाही. एस्कडेलमूर पर्यंत त्या बरोबरच होत्या. रस्ता खूपच खराब होता. माझ्या दोन्ही हातामधे मुंग्या ( Tingling numbness) जाणवू लागल्या . 

 

ब्रॉमटन - ( Brompton 865 km) एस्कडेलमूर ला पवार सर होते. आम्ही नाष्टा करेपर्यंत त्यांनी सायकल चे गीअर पुन्हा दुरुस्त केले. त्यांचा निरोप घेवून पुढे निघालो आणी रस्ता चुकलो. सहा सात किमी पुढे जावून परत माघारी आलो. यामधे एक दिड तास गेला.  दहा बारा किमी वाट चुकल्यावर परत योग्य मार्गाला लागलो. सुरुवातीचा रस्ता तीव्र चढाचा होता. मजल दरमजल करत कार्लाईल पर्यंत पोहोचलो. येथून पुढे ऊलटा वारा ( Headwind ) इतका होता कि स्पीड 10-12 चे पुढे जाईना. ब्रॉमटन येईपर्यंत पूर्ण थकलो होतो. कंट्रोलवर आलो तर तो बंद करण्याचे तयारीत होते. तेथे आम्हाला अन्न पाणी काहीही नव्हते. फक्त एक एक 500 मीली कोक मिळाला. पुढे गावात मिळाले तर मिळाले अन्यथा ऊपाशीपोटी सायकल चालवावी लागणार होती.  त्यात ४-६ गीअरच पडत होते, त्यात मला Saddle sore झाले होते. त्यातून अक्षःरशा रक्त पडत होते. तसेच माझ्या उजव्या हाताच्या मुंग्या ( Tingling numbness) वाढला होता. झांजुर्णे सरांनी मला स्पष्ट शब्दात राईड सोडायला सांगीतले. एका स्वयंसेवकाने त्याच्या कारमधे मला कार्लाईल रेल्वे स्टेशन ला सोडले. आम्ही तेथून लंडन ला गेलो.